पुढच्या कॅबिनेट बैठकीत वारकऱ्यांच्या भावना मुख्यमंत्र्याच्या कानावर घालणार असून त्यातच वारीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. आज (दि.28) आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासंदर्भात उपमुख्यमंत्री आणि पालखी सोहळ्याच्या मान्यवरांची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले, वारकरी संप्रदायाकडून पायी वारीच्या मागणीचा आग्रह धरला जात आहे. मात्र, आजही महाराष्ट्रात 18 जिल्हे असे आहेत की तिथे करोनाबाधितांची संख्या जास्त आहे. त्यात ती साताऱ्यात जास्त आहे. वारकऱ्यांचे म्हणणे आहे की, ते इतरांना येऊ देणार नाही. वारकरी संप्रदाय जे म्हणतो ते करतो. पण वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेणे गरजेचे आहे.
पहिल्या लाटेपेक्षा सध्याची परिस्थिती अधिक गंभीर आहे. लाॅकडाऊन लावण्याची आणि वारी सोहळा बंद ठेवण्याची आम्हाला हौस नाही. पण दुसरा पर्याय उपलब्ध नाही. वारी दरम्यान रोज टेस्टिंग केले आणि जास्त करोना संख्या आढळली तर पालखी थांबवता येणार नाही, त्यामुळे परिस्थिती पाहून पुढच्या कॅबिनेट बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे अजित पवार म्हणाले
वारकऱ्यांची भूमिका –
यावर्षी 500 वारकऱ्यांना वारी करायची परवानगी द्यावी, करोनाचे सर्व नियम पाळायला आम्ही तयार आहोत. सर्व संस्थानांनी एकमत करून याबाबतचे निवेदन दिले आहे. प्रशासनाने मोजक्या वारकऱ्यांसह पायी वारीची परवानगी द्यावी, अशी मागणी बैठकीत उपस्थित वारकऱ्यांनी केली आहे.
20 जुलैला आषाढी एकादशी –
यंदा दि.20 जुलै रोजी आषाढी एकादशी असून दि.1 जुलै रोजी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तर दि.2 जुलै रोजी श्री संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे प्रस्थान आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.