- संभाजीराव काकडे यांना श्रद्धांजली
ज्येष्ठ नेते, माजी खासदार संभाजीराव काकडे हे आदर्श राजकारणी होते. त्यांच्या निधनाने जुन्या पिढीतील तत्त्वनिष्ठ नेता हरपला आहे, अशा शब्दात भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी ( दि. 10) श्रद्धांजली अर्पण केली.
जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष असलेले संभाजीराव काकडे उर्फ लाला यांचे पुणे जिल्ह्याच्या विकासामध्ये मोठे योगदान आहे. राजकारण, समाजकारण करीत असताना सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यांशी असलेली नाळ त्यांनी तुटू दिली नाही. पुणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या विकासामध्येही त्यांचे मोठे योगदान आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
ते म्हणाले, माझे काका शंकररावजी पाटील व संभाजीराव काकडे यांनी पुणे जिल्ह्यामध्ये व राज्यात एकाच वेळी राजकारण, समाजकारण केले. दोघांनीही बारामती लोकसभा मतदारसंघाचे दोन वेळा खासदार म्हणून संसदेत प्रतिनिधित्व केले. त्यांनी वेगवेगळे पक्ष असले तरी आपली मैत्री कायम जपली.
निबूतच्या काकडे घराण्याचा मोठा वारसा त्यांना लाभला होता. एक वैचारिक राजकारणी म्हणून त्यांची राज्याच्या राजकारणामध्ये ओळख होती. देशपातळीवरील अनेक नेत्यांशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते.लोकनेते संभाजीराव काकडे यांच्या निधनाने जुन्या पिढीतील आदर्श राजकारणी काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशी भावना हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली. दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून काकडे कुटुंबियांचे सांत्वन केले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.