वृत्तसंस्था // प्रतिनिधी
राज्यात कोरोनाने थैमान घातल्याचे चित्र आहे. मुंबई आणि पुण्यात तर परिस्थिती हाताबाहेर जातेय की काय अशी भीती निर्माण झाली आहे. राज्यसरकारच्या उपाययोजना फेल होताना दिसत आहेत. मात्र आता सामान्य जनतेच्या खिशाला कात्री राज्यसरकारच्या एका निर्णयामुळे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेली अभूतपूर्व स्थिती, लॉकडाऊनमुळे तळाला गेलेली अर्थव्यवस्था अशा स्थितीत राज्यावर प्रचंड आर्थिक ताण पडला आहे. ही परिस्थिती असल्याने सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरचा सेस वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात पेट्रोल आणि डिझेल 2 रुपयांनी महागणार आहे.
1 जूनपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. लॉकडाऊनमुळे सगळे व्यवहार बंद असल्याने सरकारच्या तिजोरीत येणारा पैसा जवळपास बंदच झाला असून आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड खर्च वाढला आहे. त्यामुळे पैशाचं गणित कसं जुळवायचं याची चिंता सरकारला पडली आहे. हा टॅक्स वाढल्यामुळे महागाईसुद्धा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र सरकारने पेट्रोलवरील मूल्यवर्धित कर प्रतिलिटर 26 टक्के कायम ठेवला असून, उपकर मात्र, 10 रुपयांवरून 12 रुपये केला आहे. यामुळे पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपये वाढ होईल. याचबरोबर डिझेलवरील मूल्यवर्धित कर प्रतिलिटर 24 टक्के कायम ठेवण्यात आला असून, उपकर 1 रुपयावरुन 3 रुपये करण्यात आला आहे.
दरम्यान, इंधन दरात वाढ झाल्यास ग्राहकांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार आहे. लॉकडाउनमुळे अगोदरचे सर्व व्यवहार थंड असताना आणि नागरिकांच्या खिशात पैशाची चणचण असताना इंधन दरवाढ झाल्यास नवी समस्या निर्माण होऊ शकते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.