पंढरपूर // प्रतिनिधी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या सावळ्या विठूरायाच्या मूर्तीस लवकरच वज्रलेप लावण्यात येणार आहे. याबाबतची परवानगी शासनाकडून नुकतीच मंदिर समितीला मिळाली आहे.
विठ्ठलाच्या मूर्तीचे संवर्धन व्हावे. या हेतूने पुरातत्व विभागाने विठ्ठल मुर्तीस वज्रलेप करण्याची शिफारस मंदिर समितीस केली होती. यानुषंगाने मंदिर समितीच्या माध्यमातून विधी व न्याय खात्याकडे विठ्ठलमूर्तीस वज्रलेप करण्याची 16 मार्च रोजी परवानगी मागितली होती . सदरची परवानगी विधी व न्याय खात्याकडून आज मंदिर समितीला प्राप्त झाली.
विठ्ठलाच्या मूर्तीस 2012 साली वज्रलेप करण्यात आला होता. यानंतर आता विठ्ठलाच्या मूर्तीस वज्रलेप करण्यात येणार आहे. सदरचा वज्रलेप हा आषाढी एकादशी पूर्वी करण्याचा मंदिर समितीचा मानस आहे. या दृष्टीने आता मंदिर समिती प्रशासन हालचाली करीत आहे. कारण वज्रलेप करीत असताना विठ्ठलाचे दर्शन बंद ठेवावे लागते. सध्या लॉकडाउनमुळे 30 जून पर्यंत मंदिर बंद असणार आहे. या कालावधीतच सदरचा वज्रलेप विठ्ठलाच्या मूर्तीस लावण्यात येईल असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.