पंढरपूर // प्रतिनिधी
येथील नगरपालिकेने नदीच्या पैलतीरावर 65 एकर जागेवरील इमारतीत कोव्हिड हॉस्पिटलसाठीची प्राथमिक कामे सुरु केली आहेत. नगरपालिकेने हॉस्पिटलच्या कामासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर आठ दिवसात 50 बेडचे हॉस्पिटल प्रत्यक्ष सुरु होईल. या हॉस्पिटलसाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
पंढरपूर शहरात कोव्हीड हॉस्पिटल कुठे सुरु करायचे, या विषयी अनेक दिवस वाद सुरु होता. सुरुवातीस उपजिल्हा रुग्णालयात हे हॉस्पिटल सुरू करण्याच्या हालचाली शासनाकडून सुरु होत्या. त्यावेळी आमदार भारत भालके यांनी त्याला विरोध केला होता. त्यानंतर शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्याच्या दुष्टीने शासकीय अधिकाऱ्यांनी तयारी केली होती.
तालुक्यातील उपरी येथील एका रुग्णाला पंढरपूर शहरातील जनकल्याण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यासाठी आणण्यात आले, असताना त्या भागातील दिपक वाडदेकर यांनी तिथे कोव्हिड हॉस्पिटल सुरु करण्यास विरोध केल्यामुळे त्या रुग्णाला पुन्हा सोलापूरला पाठवण्यात आले होते.
दरम्यान खासगी हॉस्पिटलऐवजी उपजिल्हा रुग्णालयातच कोव्हिड हॉस्पिटल सुरू करण्यास आमदार भारत भालके यांनी मान्यता दिली. परंतु तेथील माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, बांधकाम समितीचे सभापती विक्रम शिरसट, नगरसेवक अक्षय गंगेकर यांनी तिथे हॉस्पिटल सुरु करण्यास विरोध दर्शवला. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत परिचारक यांनी नदीच्या पैलतीरावरील 65 एकर जागेतील इमारतीत हॉस्पिटल सुरु करण्याची सुचना केली होती. नगरपालिकेने काही निधी उपलब्ध करुन द्यावा. त्याशिवाय आमदार निधी तसेच माढा आणि सोलापूर मतदार संघातील दोन खासदारांच्या फंडातून आणि जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी मिळवता यईल, अशी भूमिका घेतली होती. त्यानुसार नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळात या विषयाला मंजुरी देण्यात आली होती.
शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना देखील पुढील कार्यवाही सुरु झाली नव्हती. शहरालगत वाखरी येथील एमआयटीचे संस्थापक विश्वनाथ कराड यानी कोरोना केअर सेंटरसाठी तेथील इमारत आणि सर्व सुविधा तत्काळ उपलब्ध करून दिल्या.
त्यामुळे पंढरपूर शहर व तालुक्यातील रुग्णांची तात्पुरती सोय झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोविड हॉस्पिटल त्वरित सुरू होण्याची गरज आहे.
निधीविषयीची पत्रे जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली असल्याची माहिती मिळाली आहे.
- अनिकेत मानोरकर मुख्याधिकारी, नगरपालिका

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.