वृत्तसंस्था // प्रतिनिधी
राज्यातील हॉटेल्स लवकरच सुरु होणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीसाठी या व्यवसायाच्या कार्यपद्धतीवर सध्या काम सुरु आहे, ती अंतिम झाल्यास या व्यवसायालाही मिशन बिगिन अगेन अंतर्गत इतर उद्योग-व्यवसायांप्रमाणे सुरुवात होईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभागी होते.
मुख्यमंत्री म्हणाले, "मिशन बिगिन बिगिन अगेन मोहिमेंतर्गत राज्यात आपण उद्योग व्यवसाय सुरु केले आहेत. महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायांत हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे. ही बाब लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरु करता येईल यासाठी करोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार केली असून ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्तराँ सुरु करण्याचा विचार आहे." यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हॉटेल व्यवस्थापनांनी आपल्या कामगार व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये असे सांगितले.
"मुंबई व शहरांतील सर्व हॉटेल्स या करोना युद्धात आमच्याबरोबर आहेत त्यासाठी त्यांचे अभिनंदन. पर्यटन व्यवसायातील महत्वाचा उद्योग असलेली हॉटेल्स तसेच लॉजेस सुरु करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. यासाठी हॉटेल व्यावसायिकांची दुहेरी जबाबदारी आहे. हॉटेल्समध्ये येणारा प्रत्येक अभ्यागत, प्रवाशी निरोगी असेल यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करावी लागेल कारण एक कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती हॉटेलमध्ये आला तरी सर्व हॉटेल व कर्मचारी आजारी पडू शकतात," असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
हॉटेल्स सुरु करायला काही अडचण नाही, मात्र राज्य शासनाने आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आपल्याला नियमांचे पालन करावे लागणार आहे. आज जे स्थानिक कामगार, कर्मचारी आपल्या हॉटेल्समध्ये आहेत त्यांना काढू नका. यात आपण काहीतरी मार्ग निश्चितपणे काढू, या संकट समयी कामगार संघटना देखील अवाजवी मागण्या करणार नाहीत असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.