सोलापूर // प्रतिनिधी
पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात व भीमा खोऱ्यात झालेल्या पावसामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. शनिवारी (ता. १८) सकाळी धरणातील पाणीसाठा उणे ०.२६ टक्के इतका होता, त्यामुळे रात्रीपर्यंत उजनी धरण प्लसमध्ये येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सलग तिसऱ्या वर्षी उजनी धरण जून- जुलैमध्ये प्लसमध्ये आले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत बारा दिवस आधीच उजनी धरण प्लसमध्ये आले आहे. त्यामुळे धऱणावर अवलंबुन असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या उजनी धरणवर तीन्ही जिल्ह्यातील शेती, उद्योग व पिण्याच्या पाणी योजना मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. त्यामुळे उजनी धरणातील पाणी साठ्याकडे शेतकऱ्यांसह उदयोग, व्यवसाय व नागरिकांचे लक्ष असते. चालू वर्षी सुरुवातीपासून धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये पावसाने हजेरी लावली होती. तसेच, पुणे नगर व सोलापूर जिल्ह्यामध्येही समाधानकारक पाऊस होत होता. त्यामुळे धरणातील पाणी उचलण्याचे प्रमाणही कमी झाले होते. भीमा खोऱ्यात होत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये सातत्याने वाढ होत होती. शनिवारी (ता. १८) सकाळी आठ वाजता उजनी धरणातील पाणी पातळी ४९१ मीटर झाली होती, तर उपुयक्त साठ्याची टक्केवारी उणे ०.२६ टक्के इतकी झाली होती. शनिवारी सायंकाळी सहापर्यंत उजनी धरण प्लसमध्ये येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
उजनी धरण गतवर्षी जुलैअखेर प्लसमध्ये आले होते, चालु वर्षी मागील वर्षाच्या तुलनेत बारा दिवस आधीच धरण प्लसमध्ये आले आहे. मागील तीन वर्षे सलग धरण जुन- जुलैमध्ये प्लसमध्ये येत आहे. त्यामुळे त्याचा फायदा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना होत आहे. चालु वर्षी जुलैच्या मध्यामध्येच धरण प्लसमध्ये आल्याने शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे आडसाली ऊसाच्या लागवडीमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.