सोलापूर // प्रतिनिधी
शासनाने गायीच्या दुधाला प्रतिलिटर 25 रुपये दर देण्याचे आदेश दिलेले असताना सोलापूर जिल्हा दूध संघाने शासनाचे नियम डावलून फक्त 19 रुपये दर दिला आहे. त्यामुळे दूध उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याने जिल्हा दूध संघावर कारवाई का करू नये, अशी नोटीस विभागीय सहनिबंधक यांनी दूध संघाला मेलद्वारे दिली आहे.
जिल्हा दूध संघाला शासनाने गायीच्या दुधाला 25 रुपये दर देण्याचे लेखी आदेश दिले होते. दुधाचे दर परवडत नसल्यामुळे दूध उत्पादकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कमी दराने दुधाची खरेदी होत असल्यामुळे उत्पादकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. संघाकडून गायीच्या दूध दरामध्ये कपात केल्यामुळे शासनाने अनुदान देण्याची मागणी दूध उत्पादकांकडून केली जात आहे. सध्या दुधाचा दर आणि चारा व पशुखाद्य यांचे भाव वाढत असल्याने उत्पादन खर्च वाढला आहे.
उत्पन्न आणि खर्चात मोठी तफावत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर दूध व्यवसाय उद्ध्वस्त होईल. त्यामुळे जिल्हा दूध संघाने तत्काळ गायीच्या दुधाला 25 रुपये दर देण्याचे आदेश शासनाने दिले. तरीदेखील दूध संघाने 25 रुपये दर देण्याऐवजी 19 रुपये दर दिला आहे. जिल्हा दूध संघ 1 ऑगस्टपासून गायीच्या दुधाला 19 रुपये दर देत आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना आर्थिक फटका बसत आहे. जिल्हा दूध संघ शासनाच्या नियम व आदेशाची अंमलबजावणी करीत नाही, म्हणून संघाला कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.
या नोटिसीमध्ये असे स्पष्ट नमूद आहे की, जिल्हा दूध संघाने शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे संघावर सहकार कायद्यांतर्गत कारवाई का करू नये.
दूध संघाकडून कमी दराने दुधाची खरेदी
गायीच्या दुधाला 25 रुपये दर देण्याचे शासनाचे स्पष्ट आदेश असताना जिल्हा दूध संघाने 19 रुपये दर दिला आहे. संघाने दूध उत्पादकांकडून बेकायदेशीररीत्या दुधाची खरेदी केली आहे. त्यामुळे कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे पुणे विभागीय सहनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी सांगितले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.