वृत्तसंस्था // प्रतिनिधी
मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे मंगळवारी साताऱ्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. 'आई माझी काळूबाई' या मालिकेच्या चित्रीकरणासाठी साताऱ्यात असताना त्यांना करोनाची लागण झाली. शेवटच्या दिवसात आशालता वाबगावकर यांच्यासोबत त्यांची जवळची मैत्रिण आणि सहकलाकार अलका कुबल होत्या.
अलका कुबल आणि त्यांच्या पतीने दोघांनी मिळून आशालता वाबगावकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. "मागच्या ३५ वर्षांपासून आम्ही दोघी परस्परांना ओळखायचो. अनेक चित्रपट-मालिकांमध्ये आम्ही दोघांनी आई आणि मुलीचा रोल केला आहे. माहेरची साडी (१९९१) हा आमच्या दोघींच्या करिअरमधील मैलाचा दगड आहे.
पडद्यापलीकडे आमच्यादोघींमध्ये मैत्रीचे दृढ नाते होते. माझ्या नवऱ्याला त्या त्यांच्या जावई समजायच्या" असे अलका कुबल यांनी मुंबई मिररशी बोलतना सांगितले.
" 'आई माझी काळूबाई' मालिकेच्या चित्रीकरणासाठी महिन्याभरापूर्वी अशालता वाबगावकर साताऱ्यात आल्या. ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे सरकारी नियमानुसार स्वत:च्या मर्जीने चित्रीकरण करत आहे, असे त्यांनी लिहून दिले होते. मालिकेच्या सेटवर एकूण २२ जणांना करोनाची लागण झाली. ते सर्व पाच दिवसात बरे झाले. पण वयोमानामुळे अशालता वाबगावकर यांच्या प्रकृतीत मात्र सुधारणा झाली नाही" असे अलका कुबल यांनी सांगितले.
"मी आणि माझे पती मागच्या चार दिवसांपासून त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये होतो. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. त्यांनी त्यांच्या आवडत्या खाद्यपदार्थांबद्दलही विचारणा केली होती." असे अलका कुबल यांनी सांगितले. आपल्या प्रकृतीबद्दल कुटुंबीयांना काही सांगू नको, तसेच वेळ आली तर तूच अंत्यसंस्कार कर, असे सुद्धा त्यांनी अलका कुबल यांना सांगितले होते.
"ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यानंतर ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यानंतर सोमवारी रात्री आशालता वाबगावकर यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मंगळवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. करोनाच्या साथीमुळे त्यांच्या कुटुंबाला इथे साताऱ्यात येता आले नाही. त्यांनी आम्हाला अंत्यसंस्कार करायला सांगितले. आशालता वाबगावकर मला आईसमान होत्या. त्यांची शेवटची इच्छा पूर्ण केल्याचे मला समाधान आहे" असे अलका कुबल यांनी सांगितले.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.