शेतकऱ्यांना रेल्वेकडून दीपावलीची खास भेट
सोलापूर // प्रतिनिधी
भारतीय रेल्वे शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलत असून दीपावलीची खास भेट दिली आहे. किसान रेल्वेच्या माध्यमातून होणाऱ्या शेतमाल व फळांच्या वाहतुक खर्चावर पन्नास टक्के अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या अन्न प्रक्रिया मंत्रालयाने घेतला आहे. आत्मनिर्भर अभियानाअंतर्गत ऑपरेशन ग्रीन अंतर्गत पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे शेतकरी कमी किमतीत आपले उत्पादन बाजारात पाठवू शकणार असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याची माहिती भाजपचे सांगोला तालुकाध्यक्ष चेतनसिह केदार-सावंत यांनी दिली.
देशांतर्गत शेतमालाच्या वाहतुकीला गती मिळावी याकरिता केंद्र सरकारने किसान रेल्वेचा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला आहे. शेतकऱ्यांच्या मोठया प्रतिसादानंतर रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या. आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आणखी एक भेट दिली आहे. रेल्वेमार्फत अधिसूचित भाजीपाला आणि फळांच्या वाहतुकीवर सरकारने 50 टक्के अनुदान जाहीर केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता मालवाहतूक शेतकर्यांना अधिक परवडेल. भारतीय रेल्वेकडून फळ आणि भाजीपाला घेण्यासाठी त्यांना केवळ 50 टक्के भाडे द्यावे लागेल. आत्मनिर्भर अभियानातील ऑपरेशन ग्रीन अंतर्गत किसान रेल्वेच्या माध्यमातून शेतमाल बुकिंग करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
केंद्राच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाने प्रायोगिक तत्त्वावर ऑपरेशन ग्रीन योजनेचा विस्तार करून टोमॅटो, कांदा आणि बटाटे यासह सर्व फळे आणि भाजीपाला या कक्षेत आणण्याची घोषणा केली होती. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी ऑपरेशन ग्रीनचा विस्तार करण्यासाठी पाचशे कोटींचा निधी जाहीर केला होता. देशाच्या बाजारपेठेत शेतीमाल विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना आता 50 टक्केच भाडे द्यावे लागणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने शेतकऱ्यांना ही दीपावलीची भेट दिली असून शेतकरी कमी किमतीत आपले उत्पादन बाजारात पाठवू शकणार असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिह केदार-सावंत यांनी दिली.
चौकट- किसान रेल्वेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या फळ व भाजीपाला वाहतुकीवर मिळणार अनुदान : फळे - डाळिंब, बोर, आंबा, केळी, पेरू, किवी, लिची, पपई, मोसंबी, संत्रा, लिंबू, अननस, डाळिंब, सफरचंद, फणस, बदाम, आवळा, पॅशन फ्रुट, पियर फ्रूट. भाजीपाला - चवळीच्या शेंगा, कारली, वांगी, काकडी, गाजर, फुलकोबी, हिरवी मिरची, बटाटा, टोमॅटो, कांदा, आले, भेंडी, वाटाणे. लसूण, कांदा, बटाटा आणि टोमॅटोच्या वाहतुकीवर तातडीने 50 टक्के अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. - चेतनसिह केदार सावंत, भाजप तालुकाध्यक्ष, सांगोला


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.