वृत्तसंस्था // प्रतिनिधी
४० वर्ष भाजपासोबत असलेले ओबीसी नेते म्हणून ओळख असणारे एकनाथ खडसेंनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली, खडसे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. कन्या रोहिणीसह आज दुपारी २ वाजता पक्षाध्यक्ष शरद पवार आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेश पार पडणार आहे. एकनाथ खडसे यांनी आपल्यासोबत एकही आमदार, खासदार राष्ट्रवादीत येणार नसल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे. पक्षप्रवेशासाठी नाथाभाऊ कालच हेलिकॉप्टरने जळगावहून मुंबईत दाखल झाले. तर त्यांचे हजारो समर्थक आपल्या वाहनांनी मुंबईकडे रवाना झाले होते.
पक्षप्रवेशापूर्वी नाथाभाऊ आपल्या समर्थकांसह जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. आपल्या बाजूने कार्यकर्त्यांची मोठी फळी असल्याचे ते भाजपला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. एकनाथ खडसेंसोबत जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्य़ांतील त्यांचे समर्थकही पक्षात प्रवेश करणार आहेत, असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. तसंच खडसे यांच्या पुनर्वसनाबाबत कोणी चिंता करू नये, असंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांवर खडसेंची वर्णी लावली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर खडसे यांना गृहनिर्माण, जलसंपदा किंवा कृषी अशा मोठ्या खात्याची जबाबदारी मिळण्याची चर्चा आता जोर धरु लागली आहे. दरम्यान, गृहनिर्माण खातं सध्या जितेंद्र आव्हाड तर जलसंपदा खातं जयंत पाटील यांच्याकडे आहे. आव्हाड आणि पाटील हे दोघेही राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते आहेत. अशावेळी त्यांच्याकडून मोठ्या खात्याची जबाबदारी काढून ती भाजपमधून येणाऱ्या खडसेंना दिली जाणार का? असा प्रश्नही दबक्या आवाजात विचारला जात आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.