वृत्तसंस्था // प्रतिनिधी
भाजपाला सोडचिठ्ठी देत एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, मात्र खडसेंना पुनर्वसन करणार कसं? असा प्रश्न राष्ट्रवादीसमोर असणार आहे. एकनाथ खडसेंना कृषिमंत्री देण्यात येईल असं सांगण्यात येत होतं, परंतु शिवसेना कृषी खाते सोडण्यास उत्सुक नाही अशी माहिती मिळतेय, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससमोर आता खडसेंच्या पुनर्वसनाचं आव्हान असणार आहे.
सध्याच्या घडीला एकनाथ खडसे यांना मंत्रिपद देणं शक्य नसलं तर नियोजन मंडळाचं कार्यकारी अध्यक्ष पद एकनाथ खडसेंना दिलं जाऊ शकतं, या पदाला कॅबिनेट दर्जा आहे. नियोजन मंडळाचं पद देऊन एकनाथ खडसेंना ताकद देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून होऊ शकतो. टीव्ही ९ नं अशाप्रकारे दावा केला आहे. एकनाथ खडसे यांचे शिवसेनेसोबत चांगले संबंध नाहीत, त्यामुळे खडसेंसाठी ग्रामीण भागाशी कनेक्ट असलेले कृषी खातं का सोडायचं? असा प्रश्न शिवसेनेत निर्माण झाला आहे.
जर शिवसेनेने कृषी खातं सोडलं नाही तर गृहनिर्माण खाते एकनाथ खडसेंना दिले जाईल असंही सांगितलं जात आहे. परंतु जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण खाते सोडण्यास अनुकूल नाहीत. त्यामुळे तुर्तास एकनाथ खडसेंना ताकदीचं पद देण्याबाबत प्रतिक्षा केली जाईल, विरोधी पक्ष भाजपाला रोखण्यासाठी एकनाथ खडसेंचा वापर राष्ट्रवादीकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे खुद्द शरद पवार शिवसेनेला खातेबदल करण्यास तयार करतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपाला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ खडसे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत, खासदार शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल. एकनाथ खडसेंसोबत जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यादेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. तुर्तास एकनाथ खडसेंच्या सूनबाई रक्षा खडसे या भाजपातच राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.