सोलापूर // प्रतिनिधी
मोहोळ तालुक्यात होऊ घातलेल्या 76 ग्रामपंचायती भीमा परिवार व भाजप तसेच जे बरोबर येतील त्यांना घेऊन पूर्ण ताकदीनिशी लढविणार .सध्या मोहोळ तालुक्यातील 76 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्या बरोबरीने भीमा परिवारानेही अनेक ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकावला होता. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढवून निम्मी - निम्मी सत्ता हस्तगत केली
होती. त्या माध्यमातून तालुक्यात अनेक विकासकामे झाली आहेत. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या ग्रामपंचायतीप्रमाणे लढविणार असल्याचे माजी खासदार श्री. महाडिक यांनी सांगितले.
तालुक्यात भीमा परिवाराची मोठी ताकद आहे. भीमा परिवार, भाजप, समविचारी पक्ष व जे बरोबर येतील त्यांना सोबत घेऊन ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढविण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या असल्याचे श्री. महाडिक यांनी सांगितले. लवकरच एका बैठकीचे आयोजन करून कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असून त्यांची मते जाणून घेण्यात येणार आहेत व पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे भीमा परिवारात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे जिल्हा परिषद व पंचायत समितीची रंगीत तालीम असल्याचेही श्री. महाडिक यांनी या वेळी सांगीतले.
या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप, व त्यांचे सर्व संचालक मंडळ प्रा.संग्राम चव्हाण श्री शिवाजीराव गुंड पाटील श्री सुनील चव्हाण राजेंद्र बाबर भारत पाटील पांडुरंग ताटे माणिक पावर किसन बाबर एमडी बाबर महादेव बाबर डॉक्टर शैलेश बाबर हिंमत पाटील प्रमोद जाधव प्रा माउली जाधव बापूसाहेब चव्हाण दादा शिंदे तसेच भीमा परिवाराचे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट-
हायवेच्या अलीकडे अन् हायवेच्या पलिकडे ही नक्की काय भानगड ?
मोहोळ तालुक्याच्या राजकीय पटलावर सोलापूर मोहोळ मार्गे पुणे या हायवे ला वेगळेच महत्त्व आले असून आजूबाजूच्या तालुक्यामध्ये हा हायवे राजकीय चर्चेचा विषय होऊन बसला आहे. मोहोळ तालुक्यातील ही हायवे ची पॉलिटिकल बॉर्डर लाईन वरचेवर ठळक होताना दिसत आहे.हा हायवे मोहोळ च्या राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय होऊन बसला आहे.हा हायवे म्हणजे मोहोळच्या राजकिय सत्ताशाहीतील जणू "भारत-पाकिस्तान दरम्यानची सीमारेषा"बनून गेलेली आहे अशी चर्चा शिगेला पोहोचलेली आहे. नक्की काय आहे हे हायवे प्रकरण? भौगोलिक दृष्ट्या मोहोळ मधून पुण्याकडे जाणार्या या हायवेमुळे मोहोळ तालुक्यातील प्रजेच्या दृष्टीकोनातून तालुक्याचे भौगोलिक व राजकिय दृष्ट्या दोन विभाग पडले आहेत.या हायवेच्या उत्तरेकडे तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील यांचे अनगर हे गाव आहे व लोकनेते बाबुराव आण्णा शुगर प्रा. लि.आहे तर गावाच्या आजूबाजूच्या बारा वाड्या व इतर गावांचा समावेश होतो.तर हायवेच्या दक्षिणेकडे माजी खासदार मुन्ना साहेब ऊर्फ धनंजय महाडिक यांचा भीमा सहकारी कारखाना व टाकळी सिकंदर, पेनुर पाटकुल ,कुरुल, अंकोली, बेगमपूर, औंढी या मोठ्या गावांसह कार्यक्षेत्रातील 52 गावांचा समावेश होतो. साधारणपणे हायवेच्या उत्तरेकडिल परिसर आमदार श्री. राजन पाटील यांना मानणारा परिसर समजला जातो. तर हायवेच्या दक्षिणेकडील भागामध्ये खासदार श्री. धनंजय महाडिक यांचे प्रामुख्याने प्राबल्य दिसून येते.या राजकीय सीमारेषेचा मोहोळ तालुक्याचे राजकारणावर मोठा परिणाम होताना नेहमीच दिसत आला आहे.आता ही सीमारेषा आणखी गडद व ठळक होताना दिसत आहे.दोन बड्या नेत्यांना मानणार्या विचारसरणी मुळे हे दोन राजकिय विभाग इथून पुढे ही कायम चर्चेत राहणार!


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.