(२०२०-२१ हंगामातील उसाला २००० रुपये अॅडव्हान्स जमा)
सोलापूर // प्रतिनिधी
मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याने 2018-19 या गळीत हंगामात गाळपास आलेल्या उसाची 13 कोटी 29 लाख रुपये थकीत एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली असून, चालू गळीत हंगामात गळितास आलेल्या उसाची पहिली उचल म्हणून प्रतिटन २००० रुपये दिली असल्याची माहिती भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय उर्फ मुन्ना साहेब महाडिक यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना कारखान्याचे चेअरमन धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक म्हणाले, की गेल्या चार ते पाच वर्षांपासून जिल्ह्यात सतत दुष्काळसदृश परिस्थिती होती. अशा परिस्थितीत उपलब्ध ऊस जनावरांच्या चाऱ्यासाठी द्यावा लागला. अशा अडचणीमुळे कारखाना चालविणे कठीण झाले होते. 2019-20 हा गळीत हंगाम उसाअभावी बंद ठेवावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांची बिले, कामगारांची देणी व वाहतूक यंत्रणेची देणी थकली. विस्तारीकरण झाल्यानंतर चालू हंगामात जुने युनिट सध्या सुरू आहे. उसाची आवक वाढल्याने येत्या 20 डिसेंबरपासून दुसरे युनिट सुरू होणार आहे. मध्यंतरी यंत्रणेचा तुटवडा झाला होता, मात्र सध्या दररोज साडेचार हजार मेट्रिक टन ऊस गाळपास येईल एवढी यंत्रणा आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत आणखी पाचशेची यंत्रणा येणार आहे तर त्याच दिवसापासून वीज निर्मितीही सुरू होणार आहे.
भीमा कारखाना सुरू होऊ नये यासाठी मोठे प्रयत्न झाले. आता कारखाना सुरू झाल्यावरही तो बंद कसा पडेल यासाठी राज्यात कोठेही झाले नाहीत असे प्रयोग भीमावर झाले. मात्र, अडथळ्यांची शर्यत पार करून वडिलांची पुण्याई व सभासद शेतकऱ्यांचे सहकार्य लाभल्याने सध्या कारखाना सुरळीत सुरू आहे. अद्यापही कार्यक्षेत्रात सुमारे नऊ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध आहे. उसाची एफआरपी थकल्यामुळे प्रशासनाने आरआरसीची कारवाई करून साखर गोदाम सील केले आहे. एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याने येत्या दोन दिवसांत ते सील काढण्याबाबत प्रशासनाला पत्र देणार असल्याचेही धनंजय महाडिक यांनी सांगितले.
या वेळी उपाध्यक्ष सतीश (आण्णा) जगताप, कार्यकारी संचालक एस. जी. शिंदे व संचालक उपस्थित होते.
कारखान्याकडे यापूर्वीचे प्रतिटन दीडशे रुपयेप्रमाणे शेतकऱ्यांचे येणे आहे. त्याबाबत माजी खासदार धनंजय ऊर्फ मुन्ना साहेब महाडिक यांना विचारले असता, तेही लवकरच देऊ, असे त्यांनी सांगितले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.