वृत्तसंस्था // प्रतिनिधी
नेर्ली (ता. करवीर) येथे तब्बल चार महिन्यांपासून आपल्या मर्कट लीलांनी नागरिकांना हैराण करणाऱ्या व तब्बल नऊ जणांचा चावा घेणाऱ्या नर माकडास नेर्ली ग्रामपंचायतीच्या वतीने अखेरीस वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून पकडण्यात आले. तत्पूर्वी पंचवीस ते तीस माकडाच्या टोळक्याने तीन महिन्यांपासून संपूर्ण नेर्ली गावांमध्ये व शिवारांमध्ये धुमाकूळ घालत सिमेंट पत्र्याची व कौलारू घरे, फळबागा व पिकांचे अतोनात नुकसान केले होते. या टोळीला माकड पकडणाऱ्या व्यक्तींकडून पकडून त्यांच्यामुळे अधिवासात सोडण्यात आले होते. परंतु या टोळीतील सर्वात हुशार आणि वात्रट नर माकड मात्र पकडले असतानाही शिताफीने त्यांच्या जाळ्यातून निसटून पळून गेले. यानंतर या माकडाने नेर्लीतील सात स्त्रिया व दोन पुरुष अशा नऊ जणांचा कडकडून चावा घेत त्यांना गंभीर जखमी केले होते. तसेच विशेषतः स्त्रिया व लहान मुले यांच्यावर हे नर माकड वारंवार हल्ले करत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत नेरली गावचे सरपंच प्रकाश पाटील यांनी प्रादेशिक वन अधिकारी सुधीर सोनवणे यांना नर माकडाला पकडण्याची विनंती केल्यानंतर वनविभागाच्या वतीने ट्रॅक लायझिंग तंत्राने या नरवानरास भूल देऊन पकडले. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून नेली मध्ये उच्छाद मांडलेल्या नर माकड माकडाचा बंदोबस्त झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत सुटकेचा निश्वास सोडला.
या मोहिमेमध्ये वनविभाग कोल्हापूरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर व वन विभाग रत्नागिरीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद खेडकर ,सरपंच प्रकाश पाटील, वनविभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आदींनी सहभाग घेतला.
नेर्ली (ता. करवीर) येथील चार महिन्यापासून उच्छाद मांडलेल्या माकड आस वन विभागा मार्फत जेरबंद करण्यात आले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.