(पन्नास वर्षांपासून राहात असलेली 70 कुटुंबे बेघर होणार)
सोलापूर // प्रतिनिधी
जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालय व एजंटांनी मनमानी कारभार करून खोटी कागदपत्रे तयार करून प्लॉटची विक्री इतरांना केली असून मंगळवेढा तालुक्यातील देगाव (ढेकळेवाडी)येथील गावठाण हद्दीतील भूखंडाचे बेकायदेशीररीत्या वाटप केले. यात पन्नास वर्षांपासून राहात असलेली 70 कुटुंबे बेघर होणार असून, त्यांची चौकशी करावी, या मागणीसाठी मंगळवेढा – पंढरपूर मार्गावर बळिराजा शेतकरी संघटनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात देगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
याबाबत बळिराजा शेतकरी संघटनेने यापूर्वी उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांना निवेदने दिली होती. त्या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की ग्रामपंचायत गट नंबर 145, 1/2/ब, 3/2/अ, 3/2 ही जमीन आहे. या जमिनीमध्ये 1965 पासून या गावातील गोरगरीब 70 कुटुंबे राहत आहेत. याशिवाय गायरान जागेत समाजमंदिर व विविध देवांची मंदिरे असून या जागेत सातारा येथील कोयना पुनर्वसनच्या नावाखाली बोगस धरणग्रस्त दाखवण्यात आले. शासन नियमाप्रमाणे सुमारे आठ किलोमीटरच्या अंतरात जमिनी मिळालेल्या धरणग्रस्ताला रहिवासी प्लॉट देणे बंधनकारक आहे. परंतु जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालय व एजंटांनी मनमानी कारभार करून खोटी कागदपत्रे तयार करून प्लॉटची विक्री इतरांना केली. ज्या धरणग्रस्तांना प्लॉट दिल्या त्यांनी त्यांच्या जमिनी यापूर्वीच विकल्या आहेत. हा प्रकार शासन नियमाला धरून नसून गेल्या साठ वर्षांपासून रहिवासी असलेल्या गावकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. या एजंटांकडून गावाकऱ्यांना धमकावण्याची शक्यता आहे. या प्रकाराबाबत ग्रामसभेमध्ये ठराव देखील केला. तरी देखील दुर्लक्ष करत प्लॉटची विक्री केली आहे. या गंभीर प्रकाराच्या चौकशीसाठी आपण आंदोलन सुरू केले. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये सर्व शासकीय कामकाज ठप्प असताना मंगळवेढ्यात पुनर्वसनाच्या जमिनी व प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गडबड झाली असल्याची तक्रार यापूर्वीच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे करण्यात आली.
या वेळी तानाजी भाऊ खरात, सरपंच राणी ढेकळे,रासपचे पंकज देवकाते ,धनाजी गडदे, बापू मेटकरी राहूल ढेकळे, शिवाजी माने, राहूल तरंगे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी निवासी नायब तहसीलदार सुधाकर मागाडे यांना निवेदन देण्यात आले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.