वृत्तसंस्था // प्रतिनिधी
आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे आहे, त्यामुळे शिवसेनेबरोबर स्थानिक पातळीवर जमवून घ्या, असे आदेश राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांची बैठक झाली. राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची खलबतं झाल्याची माहिती आहे.
“आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे आहे. महाविकास आघाडी झाल्यानंतर स्थनिक पातळीवर खटके उडत आहे पण आपल्याला सेनेबरोबर जुळवून घ्यायचे आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर स्थानिक पातळीवर जमवून घ्या” अशा स्पष्ट सूचना अजित पवारांनी आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांना दिल्या. लवकरच महामंडळ वाटप करणार असल्याची माहितीही अजितदादांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी यापुढील सर्व निवडणुका एकत्रितरित्या लढण्याचे संकेत आधीच दिले होते.
राष्ट्रवादीच्या दिग्गजांची खलबतं
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पक्षाचे मंत्री आणि वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमदेवारांनाच या बैठकीला बोलावण्यात आले होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.