आणि एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा सन्मान करते का !
वृत्तसंस्था // प्रतिनिधी
पूर्वी स्त्री ला स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार नव्हता, स्त्री स्वतंत्र नव्हती , तरीसुद्धा त्या काळातही सावित्रीबाई फुलेनी स्त्रीला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले . रानी लक्ष्मीबाईने स्त्रीच्या शक्तीला सिद्ध केले , डाॕ.आनंदीबाई जोशी , रमाबाई आंबेडकर यासारख्या अनेक स्त्रीयांचे दाखले इतिहासात आहेत. आई जिजाऊंनी शिवाजी महाराजांसारखा पुत्र घडवला हे ही दाखले आहेत...
अलिकडील काळात कल्पना चावला , मेरी कोम, सुनिता विल्यम यांची कामगिरी पाहिली तर जेवढे योगदान पुरूषाचे आहे तेवढेच किंबहुना त्यापेक्षा जास्त स्त्रियांच्या योगदानाचे दाखले आपल्याला पहायला मिळतात.
स्त्री ही आई , मुलगी , पत्नी आहे पण दुर्गा , लक्ष्मी , सरस्वती या रूपातही तिला पूज्य मानले जाते.
स्त्री शिकली , सुशिक्षित झाली , पूर्वी चूल आणि मुल संभाळणारी स्त्री
आता घर आणि नोकरी सांभाळून सर्वच क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने कार्यरत आहे. ज्या क्षेत्रात फक्त पुरूषांची मक्तेदारी असायची त्या क्षेत्रातही स्त्री कार्यरत आहे. अगदी बस चालवणे , रिक्षा चालवणे , अंतरिक्ष, हिमालय चढणे, विमान चालवणे, साहित्य , कला ,विज्ञान , राजकारण अगदी सर्वत्र स्त्रीचा वावर आहे आणि पाॕवर ही आहे.
पण.....
येवढ्या सर्व क्षेत्रात स्त्री पुरूषांबरोबर असूनही ती सुरक्षित आहे का? तीला निर्णय घेण्याचा अधिकार आहे का ? एक महिला दुसऱ्या महिलेला योग्य वागणूक देते का ? कारण आज महिलाच महिलेचा द्वेष करताना दिसते आहे आणि तिला समाजात योग्य वागणूक मिळते का? असे अनेक प्रश्न आहेत ...
विकृतीने पछाडलेल्या लोकांपासून स्त्री आजही सुरक्षित नाही .
अगदी लहान मुलीपासून ते वृद्ध स्त्रियांवर बलात्कार होत आहेत . एकतर्फी प्रेमातून अनेक जीवघेणे हल्ले होतात. अगदी नुकतीच घडलेली हिंगणघाट घटना किंवा यापूर्वीची सांगलीची घटना , मिरजेतील घटना अशा एक ना अनेक घटना घडल्या ज्यामध्ये मुलीने नकार दिला म्हणून तिच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळणे, शस्त्राने भोसकून मारणे, अॕसिड हल्ला यासारख्या घटना राक्षसी मनोवृत्तीच्या पुरूषांमुळे घडल्या आणि त्यात मुलींचा हाकनाक बळी गेला .
घटना घडली की तेवढ्यापुरते मोर्चे, आंदोलने, मेणबत्ती संप्रदाय हे सर्व चालते पण पुढे काय ? पुन्हा ये रे माझ्या मागल्या ....ताक कण्या चांगल्या हे सुरू होते.
एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा सन्मान करते का हाही मोठा प्रश्न आहे , एखादे वेळेस १०० पुरूष एकत्र राहतील पण चार स्त्रीया एकत्र राहणार नाहीत , आजूबाजूला पाहिलं तर कित्येकदा स्त्री च स्त्रीची दुष्मन झालेली दिसतेय , काही अपवाद सोडता कुटुंबात सासू - सून , जावा - जावा , नणंद-भावजय किंवा शेजार - पाजारी स्त्री च स्त्री ला कमी लेखतेय , सतत हेवेदावे चालू असतात , एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचे कौतुक करताना फार कमी दिसतेय , उलट ती म्हणतेय माझ्या साडीपेक्षा तीची साडी सफेद का ...!
जेव्हा एक महिला दुसऱ्या महिलेचा सन्मान करेल...तेव्हा महिला दिनाचा उद्देश साध्य होईल...
जेव्हा महिला सुरक्षित होईल, जेव्हा तीच्यावर होणारे अत्याचार थांबतील, जेव्हा वासनांध पुरूषापासून स्त्री भयमुक्त होईल , मुलींना आणि जेव्हा समाजात महिलांना सन्मानने वागणूक मिळेल तेव्हाच महिलांना खरा सन्मान मिळेल आणि महिला दिनाचा उद्देश साध्य होईल .
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.