पंढरपूर // प्रतिनिधी
पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं २८ नोव्हेंबर रोजी निधन झालं. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी १७ एप्रिलला मतदान होणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
राष्ट्रवादीकडून दिवंगत भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. तर, भाजपने भगीरथ भालके यांच्या विरोधात समाधान आवताडे मैदानात उतरवलं आहे. दोन्ही उमेदवारांचे अर्ज आज दाखल करण्यात आले. त्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दोघेही आज पंढरपुरात उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा तनपुरे मठात मेळावा झाला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी जयंत पाटील म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवार देणार नाही असं सांगितलं होतं. आपण तीन तारखेपर्यंत वाट पाहू. फडणवीसांवर आताच अविश्वास दाखवणं योग्य होणार नाही’. असे सूचक वक्तव्य यावेळी पाटील यांनी केले आहे.
‘महाविकास आघाडीच्या सर्व घटकांचा भगीरथांना आशीर्वाद आहे. जेव्हापासून महाविकास आघाडी आली आहे, भाजपचा कुठेही विजय झालेला नाही. सगळे एकत्र आल्यावर भाजपचा पराभव होतो ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणूनच काहींनी भाजपची उमेदवारी घेतली नाही. फडणवीसांनी उमेदवार देणार नाही असं सांगितलं होतं. आपण तीन तारखेपर्यंत वाट पाहू. फडणवीसांवर आताच अविश्वास दाखवणं योग्य होणार नाही,’ असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
यामुळे सध्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्रात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. जयंत पाटलांच्या या वक्तव्यावर आता फडणवीस काय भूमिका घेत आहेत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.