(दोन सामाजिक कार्यकर्त्यांना घेतले पोलिसांनी ताब्यात)
सोलापूर // प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात सोलापूर जिल्ह्यातील जनमत जात आहे. दिवसेंदिवस त्यांच्या विरोधात नागरिकांमधून संताप वाढतच जात आहे. हा संताप त्यांच्या कारभाराविरोधात निषेधात्मक घोषणाबाजी करण्याबरोबरच, त्यांना काळे झेंडे दाखवण्यातपर्यंत गेला आहे. विरोधी भाजपाकडूनदेखील भरणेमामा हे आता ‘लक्ष्य’ होत असून त्यांच्यावर टीकेचे बाण सोडले जात आहेत. त्यांच्या विरोधात जनतेतील रोष दिवसेंदिवस वाढत जात आहे.
विशेष म्हणजे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात वाढणारा रोष पाहता, राष्ट्रवादीचा सोलापूर जिल्ह्यासाठीचा तिसरा पालकमंत्रीदेखील या जिल्ह्यातील जनभावनेचा परीक्षेत नापास झाल्याचे चित्र दिसत आहे. या जिल्ह्याचे ‘पालकत्व’ सांभाळण्यात राष्ट्रवादीला सपशेल अपयश आल्याचं यातून अधोरेखित होत आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील ‘पाॅवर’बाज घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने सोलापूर जिल्ह्यासाठी यापूर्वी सध्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील तसेच राज्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे सोलापूर जिल्ह्यासाठी पालकमंत्री दिले.
तथापि या जिल्ह्याचे ‘पालकत्व’ सांभाळण्यात मंञी पाटील आणि आव्हाड हे दोघेही अपयशी ठरल्याचे लक्षात आल्यानंतर, येथील जनभावनेची कदर करून इंदापूरचे आमदार आणि बारामतीकर पवार कुटुंबीयांचे अत्यंत विश्वासू शिलेदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा दिली.
माञ भरणे यांच्याकडूनही जिल्ह्याचे ‘पालकत्व’ योग्य रीतीने सांभाळले जात नसल्याचे समोर येत आहे.त्यांच्या करभाराविरोधात रोष वाढत चालला आहे. मुळातच भरणे यांना सोलापूरच्या पालकमंत्रीपदावर काम करण्यात ‘स्वारस्य’ आहे का ? हाच महत्वाचा मुद्दा आहे.
कारण पालकमंत्रीपदाची धुरा खांद्यावर घेतल्यापासून भरणे यांचे या पदावर काम करत असताना केवळ ‘पर्यटन’च चालू असल्याचे दिसत आहे. इंदापूर आणि पुणे येथे रमणारे भरणेही केवळ पर्यटनासाठी सोलापूर जिल्ह्यात येतात असाच, वस्तुस्थितीदर्शक परिस्थितीचा आरोप त्यांच्यावर कायम राहिलाआहे.
सकाळी उशीरा सोलापूर जिल्ह्यात पोहोचलेले मामा मॅरेथॉन बैठका घेऊन लगेच सोलापुरातून पळ काढतात. त्यांच्याकडून जिल्ह्याच्या कारभाराचे सुव्यवस्थित नियोजन होत नाही. त्याशिवाय केवळ मॅरेथॉन बैठकांसाठी आलेले मामा नागरिकांना भेटतच नाहीत. याबद्दल त्यांच्या विरोधात तक्रारी सुरुवातीपासूनच आहेत.
उल्लेखनीय बाब म्हणजे जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती हाताळताना, दत्तात्रय भरणे यांना पालकमंत्री म्हणून पूर्णपणे अपयश आले आहे. अत्यंत बिकट परिस्थिती हाताळताना प्रशासनावर त्यांची ज्या पद्धतीने अपेक्षित पकड असायला हवी तशी पकड नाही. मॅरेथॉन आढावा बैठका घ्यायच्या आणि पुणे जिल्ह्यात निघून जायचे, असाच त्यांच्या कारभाराचा पॅटर्न राहिल्यामुळे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर त्यांचा अजिबात दबाव दिसत नाही.
पालकमंत्री भरणे मामा इंदापूर- पुण्यात जास्त आणि सोलापुरात कमी हे त्यांच्या बाबतीतमधील वास्तव असल्याने प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी हेच जिल्ह्याचा कारभार त्यांच्या मर्जीनुसार चालवत आहेत. जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची खुर्ची दत्तात्रय भरणे यांच्या ‘अकार्यक्षम’ नेतृत्वामुळे केवळ शो पीस ठरत असल्याची टीका विरोधक करू लागले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.