वृत्तसंस्था // प्रतिनिधी
गोकुळच्या निवडणुकीसाठी राज्यकर्ते कोरोनाचा नियम पाळत नसतील तर जनतेला कोणत्या तोंडाने नियम पाळायला सांगणार. असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांनी करतानाच कोल्हापूर जिल्ह्यात निर्बंध शिथिल केले आहेत काय ? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
गोकुळच्या निवडणुकीसाठी विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ शिरोळ तालुक्यात नृसिंहवाडी आणि कुरुंदवाड येथे झाला. या कार्यक्रमासाठी विरोधी आघाडीत आणि राज्यात सत्तेत असलेले जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार आणि प्रमुख नेते उपस्थित होते. यामुळे या कार्यक्रमाला झालेली गर्दी लक्षणीय होती. या गर्दीचा संदर्भ घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव आणि राज्यकर्त्यांची बेफिकेरी याबाबत संतप्त भावना व्यक्त केल्या.
यासाठी त्यांनी प्रामुख्याने पालकमंत्र्यांनाच लक्ष्य करताना, आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात अशी गर्दी गोळा करणे याचा नेमका अर्थ काय? आतापर्यंत गोकुळच्या दोन ठरावधारकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे एक अत्यवस्थ आहे. याचाही विचार होणे आवश्यक आहे. सध्या, जबाबदार म्हणून सर्वसामान्यांचा बचाव करणे. रेमडेसिवीर इंजेक्शन व ऑक्सिजनची टंचाई दूर करून नागरिकांना दिलासा देण्याची वेळ आहे. कोरोना नियम कशासाठी ? तो सोयीस्करपणे पाळण्यासाठी आहे का ? दुर्दैवाने एखादा अनुचित प्रकार घडल्यास याची जबाबदारी कोण घेणार ? अशा भावना व्यक्त करुन त्यांनी सामान्य नागरिकांबाबत चिंता व्यक्त केली.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.