सोलापूर // प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या तीन पक्षांमध्ये आता मेळ राहिला नाही. सत्तेसाठी कोण कोणाचा गळा दाबतोय तर कोण नाक दाबण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे कोणाला कोणाबद्दलची गॅरंटीच राहिली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील जनतेची विश्वासाहर्ता गमावली आहे, अशी टीका करत माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांमुळे केवळ गृहमंत्र्यांनी नाराजीनामा देणे संयुक्तिक ठरणारे नाही तर नैतिकता म्हणून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही माजी मंत्री पाटील यांनी या वेळी केली.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांची बुधवारी गादेगाव (ता. पंढरपूर) येथे प्रचार सभा झाली. या सभेसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आले होते. सभेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी श्री. पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या लॉकडाउन धोरणांवर टीका करत, परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटींच्या आरोपामुळे मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारने महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास गमावल्याचा आरोप केला.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.