पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे येथे कोरोना बाधित रुग्णांची संख्या लक्षणीय रित्या वाढली असून अनेक रुग्ण घरीच उपचार घेत आहेत, मात्र त्यांच्या संपर्कात येणारे लोक सोशल डिस्टंस पाळत नसल्यामुळे बाधितांचा आकडा काही केल्या कमी होताना दिसत नाही. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नुकताच गावात 10 दिवसांचा जनता कर्फ्यु पाळण्यात आला होता. मात्र काही ग्रामस्थ नियम पाळताना दिसत नाहीत, त्यामुळे ग्रामपंचायतीने गावात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. ग्रामस्थांना, शासनाने सांगितल्या नुसार नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे, तरीसुद्धा ग्रामस्थ नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे.
मागील एका महिन्यात गावातील तब्बल 15ग्रामस्थ कोरोना मुळे दगावले आहेत. दररोज एखाद दुसरा रुग्ण दगावत आहे, एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना केवळ तलाठी आणि आरोग्य विभागाच्या कर्मचारी परिस्थितीशी तोंड देत आहेत.त्यामुळे ग्रामस्तरीय कोरोना समितीने नाठाळ ग्रामस्थांना वठणीवर आणण्यासाठी करकंब पोलीस ठाण्याकडे गावात पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली आहे.
तसेच खेडभोसे ग्रामस्थांना झालेला संसर्ग दुसरीकडे होऊ नये यासाठी रोपळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे, ग्रामस्थांना गावातच लसीकरण उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.खेडभोसे ग्रामस्थांना या महामारीतून वाचविण्यासाठी प्रशासनाने तातडीने आवश्यक ती कडक भूमिका घेऊन गाव कोरोना मुक्त करावे, अशी मागणी केली जात आहे.
चौकट : 1) गावात कोरोनावर उपचार घेऊन बरे झालेले 105ग्रामस्थ आहेत. सध्या कोरोना बाधित 30 रुग्ण आहेत, त्यापैकी 15 रुग्णांवर पंढरपूर येथे तर 20 रुग्णांवर गावातच घरी उपचार सुरू आहेत.
2) कोरोना समितीमधील शासकीय कर्मचारी असलेले ग्रामसेवक हे त्यांच्याकडे दोन गावांचा पदभार असल्यामुळे गावाला पूर्ण वेळ देऊ शकत नाहीत तसेच कृषी सहाय्यक ही त्यांच्याकडील जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले आहेत.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.