पंढरपूर // प्रतिनिधी
पंढरपूर शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यास आरोग्य यंत्रणेला यश आले असले तरी बाहेरून शहरात आलेल्या पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. शहर व तालुक्याोतील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता 35 झाली आहे. आठजण यापूर्वीच बरे झाले आहेत. सध्या 27 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.
ऐन आषाढी यात्रा कालावधीत कोरोनाचे रुग्ण सापडले होते. मागील आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या जैसे थे होती. आज (ता. 6) 124 पैकी 77 अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये 65 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर पाच अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 7 जणांचे स्वॅब परत एकदा घेतले जाणार आहेत. आणखी 47 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पंढरपूरकरांची चिंता वाढली आहे.
आज नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये नवी पेठेतील एका व्यक्तीला संपर्कातून बाधा झाली आहे. पुणे येथे काम करत असलेल्या एका व्यक्तीचाही समावेश आहे. सध्या तो येथील एका मठामध्ये विलगीकरण कक्षात आहे. करकंब येथील एका व्यक्तीचा समावेश असून तो येथील एका लॅबमध्ये कामाला होता. टाकळी सिंकदर येथील एकजण काही दिवसांपूर्वी लक्षणे दिसू लागल्यानंतर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आला होता.
शहर व परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. नागरिकांनी सामाजिक अंतर ठेवून मास्क आणि सॅनिटायझरचा वापरा करावा, असे आवाहन डॉ. बोधले यांनी केले आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.